आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, का, रे, नाही भेटायला आलास तुला त्यांनी कळविले नाही का त्या दिवशी रागावून गेलास. अजून नाही का राग गेला लहान मुलांचा राग लौकर जातो मग तुझा रे कसा नाही जात ये, मला भेट. सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना, असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो, असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे! दोन दिवस जावयाला लागले असते.