श्यामची आई - 39

  • 6.3k
  • 4
  • 1.7k

श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते त्यांची ती कुत्री होती. सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी, ह्याचे ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिने घातले. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून दोन दिवशी आईचे अंग नीट कढत पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून त्याने पुसून काढी. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला, तर कोलनवॉटरची पट्टी कपाळावर ठेवी.