श्यामची आई - 38

  • 6.8k
  • 3
  • 2.1k

श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. श्याम! पाय चेपू का गोविंदाने विचारले. नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन. श्याम म्हणाला. श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला रामाने विचारले. अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा! श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते.