श्यामने सुरुवात केली: आमचे कर्ज दिवसेंदिवस वढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एकदोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील-आमचे आजोबा-आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहारचतुर, हिशेबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले, तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता.