आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यांतीलच ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हां मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, श्याम! तुला पाहिजे की काय अंगठी त्यांनी असे विचारले, म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे! ती खाली पडे. अरे, जाडा हो जरा, मग बसेल हो ती. असे मग ते हसून म्हणावयाचे.