त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना. लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा डाग दिसतो का, पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत, त्यांत केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला, तो केवढा थोर कवी असेल! तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला, त्याचेही हृदय किती मोठे असेल! पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत! पाण्याला अमृत, पय, जीवन, अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते.