संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. आई! मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का आई म्हणाली, श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन, जा. आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील.