श्यामची आई - 18

  • 8.4k
  • 1
  • 2k

राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात. राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते. राजा म्हणाला, श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो. अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो. राम म्हणाला. माझ्या मनात एक विचार आहे.