श्यामची आई - 8 (क्षमेविषयी प्रार्थना) बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना, सारखी चोवीस तास सुरू असते. कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते, कधी हसते, खेळते, कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते. नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे. श्याम त्या नदीकडे पाहातच उभा होता. सृष्टिसौंदर्य श्यामला वेडे करीत असे. कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत:- राहूनी गुप्त मागे करितोसि जादुगारी । रचितोसि रंगलीला प्रभु तू महान् चितारी । किती पाहू पाहू तृप्ती न रे बघून । शत भावनांनि हृदय येई उचंबळून ॥