श्यामची आई रात्र पाचवी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा. अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे. असे म्हणून श्यामने सुरूवात केली. मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले.