श्यामची आई - रात्र दुसरी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन: